Pune News : मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमुळे आज शनिवारी (दि. २९) शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
शिवाजी रस्त्यावरील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळ मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास होईल. तेथून दत्त मंदिर, बेलबाग चौक, बुधवार चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा चौक, डेंगळे पूल, गाडीतळ चौक, आरटीओ चौकमार्गे संगम पूल येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.
लष्कर परिसरातील मिरवणुकीची सुरुवात दुपारी बाराच्या सुमारास ताबूत स्ट्रीट येथून होणार आहे. तेथून सरबतवाला चौक, बाबाजान दर्गा, भोपळे चौक, महात्मा गांधी रस्ता, कोहिनूर चौक, नाझ हॉटेल चौक, नेहरू मेमोरिअल हॉल, समर्थ पोलीस ठाणे, पॉवर हाऊस चौक, अपोलो चित्रपटगृह, दारूवाला पूल, फडके हौद, मोती चौक, सोन्या मारुती चौक, बेलबाग चौकातून लष्कर भागातील ताबूत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
खडकी भागातील मिरवणूक बोपोडी चौकमार्गे जाणार आहे. दापोडी परिसरात मिरवणुकीची सांगता होईल. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातून, तसेच लष्कर भागातील इमामवाडा येथून सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे.
ताबूत, पंजे मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक बंद करण्यात येणार असून, मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते वाहतुकीस खुले करण्यात येणार आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.