Pune News : नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचआय) माध्यमातून वाघोली ते शिक्रापूरपर्यंत (२५ कि. मी.) प्रस्तावित असलेला दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट विमाननगर- रामवाडीपासून शिक्रापूरपर्यंत (३५ कि.मी.) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना एनएचआयच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. तसेच, शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग (ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार आहे.

त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहेत.नगर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (एनएचआय) माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपासूनच करण्याचा आणि त्यापुढे शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नागपूर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूककोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शनिवारी (दि. २३) पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

उद्योगमंत्री उदय सामंत, आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे उपस्थित होते.

मेट्रो लोहगाव विमानतळापर्यंत करा
नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट लोहगाव विमानतळापर्यंत जोडा. तसेच याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या आहेत.

शिवणे-खराडी रस्ता लवकर मार्गी लावा
अनेक वर्षांपासून शिवणे-खराडी या रखडलेल्या रस्त्याबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी.

तसेच या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशा सूचना अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील धानोरी,

संतनगर, फाइव्ह नाइन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करून कार्यवाही करावी, अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *