इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या (ईव्ही) बॅटरीपासून ते इतर अनेक प्रकारच्या पार्ट्सची चाचणी करण्यासाठी आता पिंपरी-चिंचवडमध्ये प्रयोगशाळा उभारली जाणार आहे.
या प्रयोगशाळेत ईव्हीसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या पूर्वचाचण्या करण्याची व्यवस्था केली जाणार असून, पुणे जिल्ह्यातील अनेक ईव्ही स्टार्टअप्सना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील ऑटो क्लस्टरमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, या प्रयोगशाळेत कोणत्या सुविधा असाव्यात,
या संदर्भात पुण्यातील ५०हून अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून कंपन्यांना अपेक्षित असलेल्या चाचण्यांची सुविधा या प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यामध्ये बॅटरी टेस्टिंग, बॅटरी सेल्स टेस्टिंग, बॅटरीचा स्फोट होणार नाही, यासाठीची चाचणी, मोटरचे डायनो टेस्टिंग अशा विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या चाचण्यांद्वारे ईव्ही कंपन्यांना उत्पादनाच्या बॅटरी आणि इतर काही पार्ट्सची नेमकी क्षमता कळू शकणार आहे.
पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियामध्ये वाहनांच्या विविध प्रकारच्या चाचण्या करण्याची सुविधा आहे. या संस्थेचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतेही वाहन विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकत नाही.
एआरएआयमध्ये एका वेळेला शेकडो वाहने चाचणीसाठी येतात. अशा वेळी ऑटो क्लस्टरमध्ये ईव्हीच्या वेगवेगळ्या चाचण्या उपलब्ध झाल्या.
तर, एआरएआयमध्ये जाण्यापूर्वीच कंपन्यांना आपले उत्पादन अंतिम चाचणीसाठी योग्य आहे की नाही, याबाबतची माहिती कळू शकणार आहे.
त्यातून एआरएआयचा भारही कमी होईल, असे ऑटोमोबाइल तज्ज्ञांनी सांगितले. ईव्ही प्रयोगशाळेच्या प्रकल्पाच्या उभारणीचे प्रारूप तयार असून, लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये ही सुविधा कंपन्यांसाठी उपलब्ध होईल.
भविष्यात त्यामध्ये आवश्यक ते बदल करून इतरही चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, असे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ईव्हीसंदर्भातील स्टार्टअपच्या गरजा समजण्यासाठी त्यांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. त्याद्वारे प्रयोगशाळेमध्ये अपेक्षित बदल केले जाणार असून,
एकाच छताखाली चाचण्यांच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.
प्रयोगशाळेत नक्की काय करणार?
■ईव्हीच्या बॅटरीचे चार्जिंग तपासण्यासाठी ती सातत्याने चार्ज आणि डिस्चार्ज करून पाहावी लागते. त्याची चाचणी या प्रयोगशाळेत होईल.
■ बॅटरीमध्ये असलेले सर्व सेल एकाच पद्धतीने आहेत की नाही, हे तपासण्यासाठी चाचणी उपलब्ध असेल.
■बॅटरीचा स्फोट होणे, हा एक धोका आहे. त्यासाठी काही चाचण्यांची आवश्यकता असते. त्याही प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत.
■ईव्हीच्या मीटरचे डायनो मीटर टेस्टिंग करणे गरजेचे असते. ईव्हीच्या प्रयोगशाळेत टेस्टिंग करण्याची सोय आहे.