Nashik Pune Railway : महाराष्ट्र राज्य शासनाने नासिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या हायस्पीड रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गाच्या रूट मध्ये बदल करण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे.

तेव्हापासून मात्र या मार्गाबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. नासिक ते पुणे दरम्यान, प्रस्तावित करण्यात आलेल्या हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या रूट मध्ये बदल करण्याचे नेमके कारण काय असा देखील प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

खरंतर, नाशिक ते पुणे असा रेल्वे मार्ग स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतरही तयार होऊ शकलेला नाही. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वेने कनेक्ट करण्यासाठी शासनाने नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित केला आहे. हा मार्ग महारेलकडून तयार केला जाणार आहे.

यासाठी नासिक जिल्ह्यातील नासिक आणि सिन्नर तालुक्यातील 22 गावांमध्ये जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. जिल्ह्यातील 287 हेक्टर जमिन या प्रकल्पासाठी लागणार आहे. यासाठी 250 कोटी रुपयांची आवश्यकता असून यापैकी शंभर कोटी रुपयांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत 45 हेक्टर जागेचे संपादन देखील पूर्ण झाले आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना 59 कोटी रुपयांचा मोबदला देखील देण्यात आला आहे.

मात्र, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गामध्ये बदल करण्याचे जाहीर केले आहे. हा मार्ग आता शिर्डी मधून जाणार आहे.

विशेष बाब अशी की, याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता ज्या जमिनी धारकांना मोबदला देण्यात आला आहे त्यांच्याकडून संपादनाचे पैसे कसे परत मिळवायचे हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.

रेल्वे मार्गात बदल करण्याचे कारण?

नासिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे मार्गात बदल करण्याचे नेमके कारण काय ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की नासिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे मार्गात एकूण २० स्थानके, १८ बोगदे आणि १९ उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत.

या बोगद्यांमुळे मात्र या प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. परिणामी हा बोगद्यांचा खर्च वाचवण्यासाठी हा रेल्वे मार्ग शिर्डी मधून तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी रेल्वे मार्गाची लांबी 33 किलोमीटर पर्यंत वाढणार आहे.

दरम्यान या संदर्भात नाशिक जिल्हा प्रशासनाने अजून महा रेल कडून याबाबत पत्र प्राप्त झाले नसल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत संबंधित प्राधिकरणाकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *