Mumbai Local News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधल्या लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मुंबई शहरात आणि उपनगरात लोकलचे जाळे पसरलेले आहे. येथे लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
लोकल मुळे राजधानी मधील चाकरमान्यांचा प्रवास हा जलद झाला आहे. दरम्यान राजधानी मुंबईच्या धर्तीवर आता सांस्कृतिक राजधानी पुण्यात देखील लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की पुणे शहरात पुणे ते लोणावळा या मार्गावर सद्यस्थितीला लोकल सुरू आहे. या लोकलमुळे पुणे शहरातील आणि उपनगरातील कर्मचारी, विद्यार्थी यांचा प्रवास जलद झाला आहे.
मात्र या मार्गावर होणारी तोबा गर्दी, लोकलमध्ये चढताना आणि उतरताना करावी लागणारी तारेवरची कसरत, प्रवासात धक्के खात उभे रहाणे आणि दिवसाढवळ्या वाढती पाकिटमारी यामुळे पुणे लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की आता प्रवासी संघटनांच्या माध्यमातून पुणे ते लोणावळा दरम्यान मुंबई लोकलच्या धर्तीवर लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे मुंबईमध्ये प्रत्येक दहा मिनिटाला लोकल सोडली जात आहे त्याचप्रमाणे पुणे ते लोणावळा दरम्यान देखील दर दहा मिनिटाला लोकल चालवली गेली पाहिजे अशी मागणी प्रवासी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सरकारी आस्थापनांमधील कामगार, रेल्वे प्रवासी आणि दैनंदिन प्रवाशांनी प्रत्येकी दहा मिनिटाला लोकल चालवण्याची मागणी यावेळी केली आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत देहूरोड कॅन्टोन्मेंट, ऑर्डनन्स फॅक्टरी, सीक्युएएसव्ही, केंद्रीय आयुध भांडार, डीएडी डेपो, डीओडी डेपो, एमईएस आदी केंद्रीय सरकारी आस्थापना आहेत. येथील बहुतांशी कर्मचारी हे लोकलने प्रवास करतात.
म्हणून मुंबईच्या धर्तीवर लोणावळा-पुणे लोकल सुरू केल्यास आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसह दैनंदिन प्रवाशांची सुद्धा चांगली सोय होईल आणि रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल.
त्यामुळे, दर दहा मिनिटाला लोकल सुरू करण्याची मागणी कॅन्टोन्मेंट आस्थापनेतील कर्मचाऱ्यांनी यावेळी केली आहे. यामुळे आता पुण्यातही दर दहा मिनिटाला लोकल धावणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.