Pune News : मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात पुणे शहरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
शुक्रवारी (दि. १ डिसेंबर) मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यावरील हॉटेल व दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यावरील मोठ्या ब्रॅण्ड्सची दुकाने आहेत. त्यांची नावे इंग्रजीमध्ये लिहिण्यात आली आहे. महापालिकेने मराठी पाट्यांसदर्भात आदेश दिले होते.
दुकानांना मराठी पाट्या लावा नाहीतर कारवाई करू, असा इशारा महापालिकेने आदेशात दिला आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या वेळी इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोडदेखील करण्यात आली.
या वेळी चार-पाच दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्या मनसे कार्यकत्यांनी फोडल्या. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, याबाबत महानगरपालिकेला मनसेकडून पत्रही देण्यात आले होते.
तसेच, महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मनसेचे शहराध्यक्षांसोबतच मनसेचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. या वेळी मनसेचे बाबू वागस्कर, अभिनेते रमेश परदेशी देखील उपस्थित होते.