Havaman Andaj : गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर आता एप्रिलमध्येही वादळी पावसाचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासून राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली होती. कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. अशातच मात्र राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
त्यामुळे विदर्भातील काही भागांमधील तापमान 40°c पर्यंत खाली आले आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागांमध्ये तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत नमूद केले जात आहे. एकंदरीत राज्यात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्याच्या अखेरीस सुरू झालेला वादळी पाऊस आणखी काही दिवस राज्यात सुरूच राहणार असे हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचा मुक्काम आता लांबला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे.
पण, वादळी पावसाचा शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, राज्यात आजपासून पुढील चार दिवस अर्थातच 15 एप्रिल 2024 पर्यंत वादळी पाऊस सुरूच राहणार आहे.
आज राज्यातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या सदर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गारपिटीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहील असे देखील IMD ने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
तसेच, 13 एप्रिलला राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. 14 एप्रिलला देखील राज्यात पावसाची शक्यता आहे. अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनीं सुद्धा पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत.
या दिवसासाठी राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थातच 14 एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस बरसणार आहे.
विशेष म्हणजे 15 एप्रिलला देखील राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पण, 14 तारखेपासून वादळी पावसाचा जोर कमी होईल असे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. म्हणजे आणखी काही दिवस वादळी पावसाचे राहतील अन नंतर हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे भासत आहे.