Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक लोकप्रिय हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा रेल्वे मार्गावर पाहायला मिळाली. रुळावर दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या गाडीने प्रवाशांची मने जिंकलीत. आता देशातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी मागणी केली जात आहे.
विशेष म्हणजे केंद्र शासन आणि भारतीय रेल्वे देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यासाठी आग्रही आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2047 पर्यंत देशात 4,500 वंदे भारत एक्सप्रेस धावतील अशी माहिती दिली आहे. सध्या देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अशातच आता मुंबई आणि पुण्यातून गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे जाणाऱ्या भाविकांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे. खरे तर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज मुंबई आणि पुण्यातून हजारो नागरिक शेगाव नगरीत दाखल होत असतात.
अशा परिस्थितीत या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली पाहिजे अशी भाविकांची इच्छा होती. विशेष म्हणजे रेल्वे देखील देशातील सर्वच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना वंदे भारत एक्सप्रेसची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कटिबद्ध आहे.
हेच कारण आहे की, रेल्वे बोर्डाने मध्ये रेल्वेकडे कोणत्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली पाहिजे याबाबतचा प्रस्ताव मागितला होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई ते संभाजीनगर पुणे ते सिकंदराबाद मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली पाहिजे असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
सध्या रेल्वे बोर्डाकडून या प्रस्तावावर विचार सुरू आहे. जर रेल्वे बोर्डाने मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी परवानगी दिली तर निश्चितच मुंबई आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांचा शेगावचा प्रवास सोयीचा होणार आहे. यामुळे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.