Pune District News : पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी. तसेच आयटी हब म्हणून आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त. यासोबतच 2014 नंतर पुण्याला आणखी एक ओळख मिळाली आहे. ती म्हणजे पुणे आत्ता राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे.
पुण्याच्या आधी ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. पण ठाणे जिल्ह्याचे विभाजन 2014 मध्ये झाले आणि पालघर हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. दरम्यान आता राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणजेच पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील आमदारांनी या संदर्भात आता पाठपुरावा सुरू केला आहे. पुण्यातील भाजप आमदारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले आहे. यासोबतच काल पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवनेरी जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा जिल्ह्यातील आमदारांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.
आमदार महेश लांडगे यांनी या कार्यक्रमात पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली आहे. लांडगे यांच्या मते, पुणे महापालिका ही भौगोलिक दृष्ट्या राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका बनली आहे. तसेच लोकसंख्या नुसार पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
यानंतर ठाणे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो आणि मुंबई उपनगराचा तिसरा क्रमांक लागतो. आता ठाणे आणि मुंबई उपनगराचे विभाजन करण्यात आले आहे मात्र पुण्याचे विभाजन नाही झालेले यामुळे पुणे जिल्ह्याचे विभाजन होणे देखील जरुरीचे आहे.
कोणता नवीन जिल्हा तयार होणार
पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार करण्याची मागणी आमदार लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी लांडगे यांनी शिवनेरी जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, देहू आळंदी, शिक्रापूर, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ या तालुक्यांचा समावेश करण्याची सूचना देखील दिली आहे.
तर पुणे जिल्ह्यात हवेली, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, पुणे शहर यांचा समावेश असावा असे त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांना सुचवल आहे. एकंदरीत, राज्यात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार अशा चर्चा सुरू असतानाच आता पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी जोर धरू लागली आहे.