Farmer Success Story:- व्यक्तीला जर मनामध्ये काहीतरी करायची इच्छा असेल व त्यासाठी कष्ट आणि मनात असलेली जिद्द पूर्ण करण्याची ताकद असेल तर व्यक्ती कुठल्याही वयामध्ये कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. वयाची बंधन न येऊ देता मनात या पद्धतीची उमेद असणं खूप गरजेचे असते व त्या दृष्टिकोनातून काम केल्यास व्यक्तीला यश मिळते असे मात्र नक्की.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या चिखलहोळ येथील अंजनाबाई बच्छाव यांचा विचार केला तर त्यांनी पारंपारिक शेतीला तिलांजली देत रेशीम शेतीची कास धरली आणि एक क्रांतीच घडवून आणली. रेशीम उद्योगामुळे अंजनाबाईंचे कुटुंबाची आर्थिक स्थिती आता सुधारली आहे.
रेशीम शेतीतून साधली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ येथील अंजनाबाई बच्छाव या रोजंदारीने कुटुंबासोबत कामाला जात होत्या. तसे पाहायला गेले तर मालेगाव तालुक्यातील चिखल ओहोळ या ठिकाणी पाण्याची उपलब्धता चांगली आहे. या परिसरातील शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामात कापूस किंवा बाजरी सारखे पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. तसेच काही शेतकरी भाजीपाला पिकांचे देखील उत्पादन घेतात.
याच पद्धतीने अंजनाबाई बच्छाव यांची देखील शेती होती व त्या शेती सोबतच रोजंदारी करत होत्या. परंतु शेतीसोबत रोजंदारी करत असताना आपल्या शेतीशी निगडित काहीतरी जोडधंदा करावा व चांगले उत्पन्न मिळवावे त्यांचे मनापासून इच्छा असल्याकारणाने त्यांनी कुठलातरी व्यवसाय शेतीला जोड धंदा म्हणून करायचे ठरवले.
व्यवसायाच्या शोधात असताना त्यांना कृषी विभागाची मदत मिळाली व त्या ठिकाणच्या कृषी सहाय्यक मनीषा पवार यांची मदत घेऊन त्यांनी ऑनलाइन अर्ज केला व प्रशिक्षण घेऊन शेतीला रेशीम उद्योगाची जोड दिली.
पारंपारिक शेतीमध्ये कष्ट खूप असतात. परंतु त्या मनाने मोबदला मिळत नाही. म्हणून त्यांनी रेशीम शेती करण्याच्या दृष्टिकोनातून तुतीची लागवड केली व रेशीम उद्योगाला सुरुवात केली. एकेकाळी अंजनाबाई या रोजंदारीने शेतात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. या रोजंदारीला सात ते आठ हजार रुपये महिन्याला मिळतील अशा पद्धतीचा एखादा व्यवसाय असण्याची इच्छा त्यांच्या मनात होती.
परंतु कृषी विभागाच्या मदतीने त्यांना वरदान ठरला तो रेशीम उद्योग. या उद्योगाच्या माध्यमातून ते प्रत्येक महिन्याला 60 ते 70 हजार रुपये आर्थिक उत्पन्न आता मिळवत आहेत. मालेगाव तालुक्यात असलेल्या चिखल ओहोळ येथे उत्पादित होणारे रेशीम आता जालना ते बीडच्या बाजारपेठेत विकले जात आहे. दरमहा 70 हजार रुपये प्रमाणे प्रत्येक वर्षी अंजनाबाई चा परिवार दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.