Pimpri Chinchwad Traffic : पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, सर्वत्र वाहातून कोंडी पाहायला मिळते, वाहतूक कोंडीबाबत पुण्याने जगभर लौकिक देखील कमावला आहे. पण पुण्यातील वाहतूक कोंडीला फक्त वाढती वाहनांची संख्या जबाबदार नसून, सर्वत्र सुरू असलेले विकासकाम देखील तेवढेच जबाबदार आहे.
याच्या विरुद्ध वाहतूक नियोजनामुळे पिंपरी -चिंचवडने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, प्रशस्त्र रस्ते, फ्लाय ओव्हर, आणि पुण्याच्या तुलनेने कमी वाहने आणि त्यातच वाहतूक नियोजनामुळे पिंपरी चिंचवडमध्ये फारसे ट्राफिक पाहायला मिळत नव्हते, पण मागील काही काळापासून येथिक नियोजन फसलेले दिसते आहे, हिंजवडीबरोबर वाकड, पिंपरी, चिंचवड, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, तळवडे, भोसरी-मोशी-चाकण रस्ता, तळेगाव-चाकण भागातही कायमच वाहनांची कोंडी पाहायला मिळते.
अशा परिस्थितीत आता पिंपरी-चिंचवड पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसत आहेत. आणि त्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक नवीन उपक्रम देखील हाती घेतला आहे, त्यांनी रोड मॅपिंगच्या कामाला सुरुवात केली असून, शहरातील वाहतूक गंभीर दिशेने जाऊ नये म्हणून योग्य नियोजन करायला सुरुवात केली आहे.
खरं सांगायच झालं तर कोरोना नंतर वाहतूककोंडी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे, अशा स्थितीत वाहतूक कोंडीचा प्रश्न हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांकडून वाहतुकीचा आराखडा तयार केला जात आहे. जेणेकरून पुढील परिस्थिती गंभीर होऊ नये, आणि शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात राहावी.
तसे पाहायला गेले पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवड मधील रस्ते तसे बरेच मोठे आहेत. पण सध्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली येथील फुटपाथ मोठे केले जात असून, रस्ते लहान होत आहेत. याबाबत नागरिकांकडून काही सूचना, तक्रारी देखील वारंवार केल्या जात आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या परिस्थितीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नुकतीच वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर, पिंपरी, भोसरी, काळेवाडी, चिंचवड तसेच एकंदरीत बाजारपेठ असलेल्या भागातील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच नियमभंग करणाऱ्या सरकारी वाहनांवर देखील कारवाई केली जाणार असून, नियम सर्वांना सारखेच असल्याचा संदेश देण्यात आला आहे. तसेच महामार्गावरील अनेक हॉटेल, ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक आपल्या सोयीनुसार धोकादायक पद्धतीने तोडून ठेवला असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये म्हणून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, फुटपाथावरून वाहने चालविणे, चुकीच्या ठिकाणे वाहने पार्क करणे, सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबविणे, विना हेल्मेट आणि सीट बेल्ट शिवाय वाहने चालवणे यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.