Bet Dwarka Temple :- देशात पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये निसर्गस्थळे, डोंगरराजी, समुद्रकिनारे यांबरोबरच अध्यात्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. भारतभूमीवर वसलेल्या प्राचीन मंदिरांना भेट देऊन या पवित्र भूमीला पदस्पर्श झाल्याचं आत्मिक समाधान पर्यटकांना मिळतं.
द्वारका हे हिंदू धर्मियांचं पवित्र स्थान आहे. असं म्हणतात की बेट द्वारकाला भेट दिल्याखेरीज द्वारकेची तीर्थयात्रा पूर्ण होत नाही. भगवान श्रीकृष्ण याच ठिकाणी राहात होते, असं सांगितलं जातं. द्वारकेमध्ये त्यांचा राजदरबार होता आणि बेटद्वारकेमध्ये त्यांचं निवासस्थान. बेट द्वारकेमध्येच भगवान श्रीकृष्णांची त्यांचा बालसखा सुदामाशी भेट झाली होती. त्यामुळंच याला भेट द्वारका असंही म्हटलं जातं. येथील प्रादेशिक भाषेत भेट शब्दाला बेट म्हटलं जात असल्यामुळं या स्थळाचं नाव ‘बेट द्वारका’ असं नावारुपाला आलं.
पुरातत्त्व खात्याच्या सर्वेक्षणांमधून इथं काही धार्मिक पांडुलिपी आढळल्या आहेत. त्यांवरुन हे ठिकाण भगवान श्रीकृष्णांचं निवासस्थान असल्याचं सांगितलं जातं. इथं भगवान श्रीकृष्णाची अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. मात्र तेथील भगवान श्रीकृष्णांचं ५०० वर्षं जुनं मंदीर आवर्जून पाहण्यासारखं आहे. वल्लभाचार्यांनी त्याची निर्मिती केली आहे. या मंदिरामध्ये रुक्मिणीनं बनवलेली एक मूर्तीही आहे.
बेट द्वारकेच्या पूर्वेला हनुमानाचं एक मोठं मंदीर आहे. त्यामुळे या भागाला हनुमानजी का टिला असं म्हटलं जातं. इथं हुनमानाचा पुत्र मकरद्वाजचीही मूर्ती दृष्टीस पडते. हनुमंत हे ब्रह्मचारी असले तरी यासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते की,
हनुमानाच्या घामाच्या एका थेंबामुळं एका मादी माशाला गर्भधारणा झाली आणि त्यातून मकरद्वारजचा जन्म झाला. तेथून थोडं पुढं गेल्यानंतर गोमती – द्वारकेप्रमाणेच एक प्रचंड मोठी चहारदिवारी म्हणजेच चहूबाजूंनी वेढलेली भिंत पाहायला मिळते. त्यामध्ये पाच मोठे महाल आहेत. हे विशाल महाल दुमजली तिमजली आहेत.
यातील सर्वांत पहिला आणि सर्वांत मोठा महाल भगवान श्रीकृष्णांचा असल्याचं सांगण्यात येतं. त्याच्या उत्तरेला रुक्मिणी आणि राधेचा महाल आहे; तर दक्षिणेला सत्यभागा आणि जाम्बवतींचे महाल आहेत. या पाचही महालांची अंतर्गत सजावट पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात.
या महालांच्या दरवाजावर आणि चौकटीवर चांदीचे पत्रे आहेत. तसेच भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या चारही राण्यांच्या मूर्तीच्या सिंहासनावरही चांदीचं आवरण आहे. या मूर्तीचा शृंगारही विलोभनीय आणि अत्यंत मौल्यवान आहे. या मूर्तीना हिरे, मोती आणि सोन्याचे दागिने घालण्यात आले आहेत.
बेट द्वारकेमध्ये द्वारकाधीश मंदिरापासून सात किलोमीटर अंतरावर चौरासी धुना नावाचं एक प्राचीन तीर्थस्थळ आहे. हे स्थान उदासीन संप्रदायाच्या आधीन आहे. तेथे उदासी संत वास्तव्य करतात.
बेट द्वारकेला येणारे बहुतांश पर्यटक, भाविक, यात्रेकरू इथं आवर्जून भेट देतात. असं मानलं जातं की, चौरासी धुनाच्या दर्शनानं मनुष्य जीवन-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. बेट द्वारका हे समृद्ध बंदर आहे. इथं अध्यात्मिक पर्वणीखेरीज डॉल्फिन दर्शन, कॅम्पिंग तसेच समुद्रसफरीचा आनंद लुटण्याचीही व्यवस्था आहे. -कॅप्टन नीलेश गायकवाड
चार धाम यात्रा, शिर्डी, शेगांव, सोरटी सोमनाथ आदी असंख्य तीर्थक्षेत्रांना भाविक पर्यटक मोठ्या संख्येनं भेटी देत असतात. यामध्ये गुजरातला द्वारकेला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या द्वारकेपासून ३० किलोमीटर अंतरावर बेट द्वारका हे ठिकाण आहे. हे ठिकाण कच्छच्या खाडीमध्ये आहे. याला शंखोद्वार असंही म्हटलं जातं.
पहा व्हिडीओ