Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात अनेक बसचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल)
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त बसचालकांवर वाहतूक शाखेकडून जुलै ते २६ नोव्हेंबर या पाच महिन्यांत तब्बल ८६० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांच्या बसचालकांचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. यामध्ये वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करणे,
वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरीत्या न करणे, धूम्रपान करणे, बसेस बसथांब्यावर उभ्या न करणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, भरधाव वेगाने बसेस चालवणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, रुट बोर्ड बदलणे, थांबा सोडून लांब बस थांबविणे अशा नियम आणि अटींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पीएमपीएल बसचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. अशा बसचालकांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे. शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. कित्येक वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमाला बगल दिली जात आहे.
त्यामुळे काही वेळा अघटित घटना घडण्याची शक्यता असते. तर, काही वेळा पीएमपीएल बसचालकांकडून बेदरकारपणे बस चालवत असल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेक वेळा जीवघेणे अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे शहर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे.