Maharashtra News : पाणीटंचाई, पावसाचा अभाव अशा परिस्थितीत कोणते पीक घ्यावे व कशी शेती करावी? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे.
अशा अप्रतिकूल परिस्थितीत रोहोकडी येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल बाळाजी घोलप यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर टोमॅटोचे बहारदार पीक उभे केले आहे.
शेती परवडत नाही हे विधान खरे नाही. पूर्णवेळ शेतीला दिला,अन्य कुठेही फुकट वेळ घालवला नाही तर शेती नक्कीच फायदेशीर करता येते.
कोणत्या मालाला कोणत्या काळात दर चांगला मिळतो याचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन केल्यास नुकसानीची जोखीम कमी करता येते असे मत विठ्ठल घोलप यांनी सांगितले.
त्यांनी आपल्या शेतीकडे जराही दुर्लक्ष केले नाही.
खरीप व रब्बी हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थ कारण अवलंबून असते. त्यातच शेतीवरील खर्चही सर्वात मोठी बाजू आज बनली आहे.
अशाही स्थितीत उत्तम नियोजन, इच्छाशक्ती असल्यास सर्व कांही शक्य होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पारंपारिक शेतीला बगल देत सर्व कुटुंबाच्या मदतीने नियंत्रित व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर घोलप यांनी केला आहे.
रोहोकडी येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल बाळाजी घोलप यांनी दीड एकर मध्ये टोमॅटोची ४ नोव्हेंबर रोजी लागवड केली आहे.
सर्वप्रथम सऱ्या ओढून दीड एकर मध्ये उपलब्ध पाण्यामध्ये ठिबकव्दारे पाण्याची व्यवस्था केली आहे.
रोपात दिड फुटाचे अंतर ठेवले असुन आठवड्यातून एक दाते फवारणी करतात व बेड वर मिश्रण करून या रोपांना फवारणीच्या माध्यमातून डोस देतात.
सध्या प्रति कॅरेट बाजारभाव अंदाजे ४००ते ५०० रुपये असून महिनाभरात या प्लॉटमधील टोमॅटो तोडणी सुरू होईल.
बाजार भावाने साथ दिल्यास विठ्ठल घोलप व नारायण घोलप यांच्या मेहनतीचे सोने होईल यात शंका नाही.
यशापयश हे बाजार भावावर अवलंबून असले तरी पीक कसे जमवावे याचा आदर्श घोलप यांनी घालून दिला आहे. याचा इतर शेतकऱ्यांनीही आदर्श घेतल्यास शेतीचे नंदनवन होईल.
दीड लाख खर्च अपेक्षित…
सध्या थंडीचे दिवस असल्याने थंडी पिकास पोषक वातावरण असल्याने हे टोमॅटो टवटवीट दिसत आहेत, याचा एकरी खर्च सव्वा लाख रुपयांच्या जवळपास झाला असून तार,
सुतळी, काठी बांधणी व रोजंदारी खर्च, वाहतूक खर्च अंदाजे ४५ हजारांच्या जवळपास होईल. पंधरा दिवसांत पहिली तोड चालू होईल तोपर्यंत एकूण दीड लाख खर्च अपेक्षित आहे.
टोमॅटो उद्योगाला चालना देण्याची गरज
गेल्या १५ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगावसह नगर जिल्ह्यातील संगमनेर हे तालुके टोमॅटो उत्पादनाचे हब बनले आहेत.
या भागातील टोमॅटो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात विक्रीस येतो.
येथून हा टोमॅटो देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठविला जातो. काही प्रमाणात आखाती देशांमध्ये निर्यातदेखील होते. त्यामुळे नारायणगांव बाजारात दरवर्षी टोमॅटोची उलाढाल अब्जावधी रुपयांपर्यंत होते.
गेल्या काही वर्षांपासून वाढत्या सिंचन सुविधा, ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करत उन्हाळी टोमॅटो लागवडीचे प्रमाण वाढले आहे.
या परिसरात गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीयेला लागवड होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव,
शिरूरसह नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील टोमॅटो उत्पादक नारायणगांव येथील उपबाजारावर अवलंबून आहेत.
या पाचही तालुक्यांत सुमारे १० हजार हेक्टरवर टोमॅटो लागवड असते. येत्या काळात टोमॅटो प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे.
आई-वडील अडाणी म्हणून शिक्षण झालं नाही, माझ्यासोबतच अनेक शिक्षक, अधिकारी, पोलीस झाले, पण मी शेतकरी झालो.
कर्ज काढलं पण भारी झालं, आज शेतीत चांगली प्रगती झाली आहे. यामुळे जमीन सुधारली. शेतीत आता नवेपण शोधत आहे. मात्र अशा शेतकऱ्यांना शासनाने पुरस्काराऐवजी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- दौलत घोलप, शेतकरी रोहोकडी
शेतकऱ्यांना कुठेतरी शासनाने हातभार लावून शेतकऱ्यांकडील ओझं हलकं करावं, म्हणजे शेतकऱ्यांना देखील समाधान वाटेल, शेतकऱ्यांची चांगली बाजू दाखवितांना त्या शेतकऱ्याला किती कष्ट घ्यावे लागलेत, आता किती कष्ट घेतोय याचा सारासार विचार करून शासन शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलं तर हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही. –समीर गायकर, टोमॅटो उत्पादक, पाचघर
शेतीमध्ये नव्यानं सुरुवात करणाऱ्या युवकांनी हंगामी पिकांमध्ये बदल करून वेगवेगळी भाजीपाला पिके घ्यावीत व योग्य मार्गदर्शन घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो.-अंकुश आमले, प्रगतिशील शेतकरी