7th Pay Commission : केंद्रातील सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महागाई भत्ता वाढवला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे.
हा महागाई भत्ता आता जून 2024 पर्यंत कायम राहणार असून जुलै 2024 पासून पुन्हा एकदा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे.
विशेष बाब अशी की, जानेवारी 2024 पासून लागू झालेल्या महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. यामुळे लग्नसराई, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या हंगामात केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा झाला आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घर भाडे भत्ता आणि ग्रॅज्युएटीची मर्यादा देखील वाढली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा एक टक्क्यांपासून ते तीन टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक्स, वाय आणि झेड श्रेणीनुसार अनुक्रमे 27, 18 आणि नऊ टक्के घरभाडे भत्ता दिला जात होता. आता मात्र हा घर भाडे भत्ता अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि दहा टक्के झाला आहे.
अतिरिक्त 5 लाख रुपयांच्या ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या नियमानुसार ३३ किंवा त्यापेक्षा अधिक सेवेनंतर मिळणारी ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या (डीए) साडेसोळा पट होती. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना कमाल वीस लाख रुपये एवढीच ग्रॅच्युइटी मिळत असे.
म्हणजे यापेक्षा अधिकची ग्रॅच्युइटी कोणालाच मिळत नव्हती. मात्र आता महागाई भत्ता सुधारित करण्यात आला असून तो 50 टक्के झाला आहे. याचा परिणाम असा झाला की आता ग्रॅच्युईटीची मर्यादा २५ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे.
यानुसार आता कमाल ग्रॅच्युइटी मर्यादा २५ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. थोडक्यात आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना कमाल 25 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी मिळू शकते.
कामगार मंत्रालयाने ३० एप्रिल २०२४ रोजी जारी या संदर्भात एक नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोटमध्ये म्हटले आहे की, जेव्हा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५०% असतो तेव्हा ग्रॅच्युइटीमध्ये २५% वाढ होते.
यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. यामुळे सेवानिवृत्त होत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.